|
||||||||||||||||||||||
| | Artists | | | EXHIBITIONS | | | COLLATERAL PROGRAMMING | | | ART FAIRS | | | ABOUT | | | PUBLICATIONS | | | VIEWING ROOM | | | NEWS | | | BLOG | | | CONTACT |
CURRENT | PAST | NEXT | |||||||||
Dilip Ranade | |||||||||||
Visual Allegories: Poetics of Destabilization | |||||||||||
March 5 - April 25, 2016 | |||||||||||
|
|||||||||||
रंगचित्रं, शिल्प यातील आविष्काराबरोबरच रेखाचित्रण हे महत्वाचे साधन मानून गेली पस्तीस वर्ष सातत्याने दिलीप रानडे यांनी रेखाचित्रांची निर्मिती केली आहे. आज रेखाचित्रणाची स्वतःची वेगळी भाषा निर्माण करणारा रेखाचित्रकार म्हणूनही त्यांची विशेष ओळख आहे. त्यांची सुरुवातीची रेखाचित्रे रंगचित्रांच्या पूर्वतयारीसाठी तसेच विविध प्रतिमांच्या शोधार्थ होती. मात्र 1976 पासून रेखाचित्रणाकडे आविष्काराचे एक स्वतंत्र माध्यम म्हणून ते पाहू लागले. तेव्हापासून त्यांचा हा प्रवास अखंड सुरू आहे. रेखाचित्रण करण्यामागे रानडे यांचा मुख्य उद्देश मनातील नानाविध आंदोलनांना, अवस्थांना तात्काळ चित्ररूप देणे आणि आपल्या सभोवतालच्या जगातील परिसर, दैनंदिन घटना यातून शारीर-मानस प्रतिसादाद्वारे आपले प्रतिमा-विश्व व त्यापरत्वे आविष्कार व्यापक करणे हा होता. नेहमीच वापरात येणार्या सांकेतिक, चैत्रिक, रूपकात्मक प्रतिमा न वापरता प्रत्यक्षातील वस्तूंचे वास्तवदर्शी रूपे वापरून त्यातून नाट्यपूर्ण दृश्य-रूपकता घडविणे हा रानडेंच्या चित्रांचा महत्वाचा गुण मानता येईल. सभोवतालच्या सचेतन-अचेतन वस्तूंची दृश्य-अदृश्य अशी प्रतिमा रूपे, त्यांचे स्वतःशी असलेले साहचर्य यातून मनाच्या भावविश्वात घडत जाणार्या आकृतिबंधाचे थेट व वेगाने, उत्स्फूर्तपणे केलेले आविष्करण हा रानडे यांच्या चित्रप्रक्रियेतील एक महत्वाचा भाग आहे. हा गुण त्यांच्या रेखाचित्रांचा आशयही काही प्रमाणात सूचित करतो असे वाटते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील अॅकॅडमिक कला-शिक्षण आणि त्याबरोबरच पाश्चात्य दृश्यकलेचा परिचय, त्यातून समजलेल्या विविध दृश्य-संकल्पना, सौंदर्यविचार याचा प्रभाव असतानाच ‘ कलेतील भारतीयता म्हणजे नेमके काय? ‘या गुंत्यात अडकण्यापेक्षा रानडे यांनी स्वतःच्या व्यक्तित्वालाच अभिव्यक्त करण्यावर लक्ष केन्द्रित केले. मात्र त्यांनी पाश्चात्य कलेच्या इतिहासातून आलेल्या आणि काही भावलेल्या दृश्य-संकल्पनांचा प्रभाव पूर्णपणे नाकारला नाही. अति-वास्तववादी चित्रशैलीतील मॅक्स अर्न्स्ट, रेने माग्रे अशा काही चित्रकारांचा प्रभाव त्यांच्या रेखाचित्रातून दिसतो. या बरोबरच सत्तर-ऐंशीच्या दशकातील प्रायोगिक रंगभूमीची चळवळ, थिएटर ऑफ अॅब्सर्डची आलेली कल्पना, काफ्का, कामू, या अस्तित्ववादी लेखकांच्या लेखनाचा, तसेच चिं. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी या मराठी लेखकांच्या साहित्यकृतीतून आविष्कृत झालेल्या गुढतेचा प्रभावही रानडे यांच्या दृक-कल्पना विश्वाला पूरक ठरल्या. सुरुवातीच्या काळातील रानडेंची रेखाचित्रे ही छोट्या अवकाशात रेषेने बांधलेल्या आकारांच्या रचनांची होती. गेल्या काही वर्षांपासून मात्र रानडेंच्या रेखाचित्रांचा अवकाश वाढला आहे. तसेच काही ठिकाणी ठिपक्यांच्या (Stippling) पोतामुळे आकारांची घनताही दिसते, तर काही चित्रात बिंदूनी रेषा काढल्यामुळे आधीच्या चित्रातील करकरीतपणा जाऊन रेखाचित्रात लवचिकता आलेली दिसते व त्या बरोबर ती वास्तव आणि भासमय परदेशात फिरते. त्यामुळे या रेखाचित्रांची दृश्य-आकर्षकता वाढली आहे. काही ठिकाणी प्रतिमांच्या मांडणीतून कथनात्मकताही प्रतीत होत आहे असे वाटते. रानडेंच्या रेखाचित्रातील रेषा वैशिष्ट्यपूर्ण असून ती त्यांनी हेतुपुरस्सर निवडलेली आहे. तीक्ष्ण, एकाच जाडीची काळी करकरीत रेषा कागदावरील अवकाश कापत आकार घडवत जाते. रेषेमध्ये कुठेही दाब देऊन किंवा अन्य तंत्राने बदल केलेला नसतो.ती अशी ठेवण्यामागे रानडेंचा हेतू एवढाच की रेषेच्या चलन-वैविध्यातून येणारी फसवी दृश्य-भावनिकता आणि लालित्य त्यांना मुळीच अभिप्रेत नाही. उत्स्फूर्त पण संयत व रेषेचा प्रवाहीपणा राखून केलेली, तटस्थ भाववृत्तीने केलेली ही रेखाचित्रे आहेत. रेषा-आकार आणि अवकाशातील रचनाबंध यातूनच आविष्कृत होणारा निव्वळ सौंदर्यभाव त्यांना अभिप्रेत आहे. मुळातच तर्काधिष्ठित आणि वैचारिकतेला प्राधान्य देणार्या रानडेंचा हा स्वतःच्या रेखाचित्राबाबत वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असावा. रानडेंच्या रेखाचित्रातील प्रतिमाविश्व त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलुतून घडले आहे. वैचारिक भोवरे निर्माण करण्याची त्यांची मानसिकता, स्वतःलाच वेळोवेळी प्रश्न विचारून घेतलेला वेध, वैज्ञानिक कुतूहल, प्रत्येक गोष्टीबद्दलची साशंकता, अतिशय संवेदनशील मन आणि कल्पनाशक्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची काही ठळक वैशिष्ट्य आहेत. या बरोबरच वस्तुसंग्रहालयातील त्यांच्या कामाचे स्वरूप, नॅचरल हिस्टरी विभागातील प्राणीजगताचा झालेला परिचय, टॅक्सीडर्मी, डायोरामा, रिस्टोरेशन, मोल्डिंग-कास्टिंग इत्यादि तंत्राचा करावा लागणारा वापर, या सर्वांमुळे त्यांच्या प्रतिमांची वैविध्यता वाढली आहे. या बरोबरच रंगभूमी, साहित्य, मानसशास्त्र, तत्वज्ञान, चलचित्र-छायाचित्रण या क्षेत्रांबद्दल असणारी आस्था व औत्सुक्य, यातूनही त्यांचे प्रतिमाविश्व व्यापक बनलेले आहे. रानडेंच्या रेखाचित्रातील रचनाबंधाला एक गूढ – अतिवास्तववादी, काहीसा अद्भूत ( फॅंटसी वर्ल्ड ) जगाचा स्पर्श दिसतो. दैनंदिन जीवनातील साधे प्रसंग देखील अत्यंत संवेदनशीलपणे न्याहाळणे आणि त्यातील उपरोधिकता टिपणे, याचेही रेखाचित्रातून काहीवेळा दर्शन घडते. त्यांच्या रेखाचित्रातील प्रतिमा स्पष्ट रेखांकित असतात व त्यात विरूपण (Distortion) असूनही वस्तु-रूपाची ओळख टिकून असते. मात्र इतर भिन्न प्रतिमांच्या सान्निध्यामुळे व अवकाशात केलेल्या त्यांच्या मांडणीमुळे दैनंदिन आयुष्यातील त्यांचे रूढ अर्थ गळून पडतात. विविध प्रतिमांच्या वैचित्र्यपूर्ण मांडणीतून या वस्तु-रूपांना लाभलेले वेगळे संदर्भ, अर्थांची, आशयांची अनेक अस्पष्ट, धूसर वलये ते निर्माण करू पाहतात. काही ठिकाणी पेचातही टाकतात. एखाद्या कूट प्रश्नासारखे किंवा कोड्यासारखे! त्यांच्या चित्रातील दृश्यरूप स्पष्ट, ठसठशीत पण आशय काहीसा संदिग्ध आणि अमूर्त! रानडेंची रेखाचित्रे पाहताना आपण एका वेगळ्याच कल्पनासृष्टीत प्रवेश करत आहोत हे जाणवते. रंगभूमीवरील एखादे स्थिर दृश्य, इसापनीतीतील प्राणी आणि मानव यांच्या नात्यांच्या गोष्टी अनुभवाव्यात तसे कल्पना आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर आपण तरळत असतो. अनेक प्रतिमांचा एकाचवेळी काही ठिकाणी बंदिस्त तर काही ठिकाणी मुक्त अवकाशात घडून आलेला संवाद-विसंवाद, स्थिरता-अस्थिरता, जडत्व आणि तरलता अशी वेगवेगळ्या स्तरावर झालेली गुंतागुंतीची रचना ही आपल्या अवतीभोवती असलेल्या वास्तवातील तार्किक व सुसंगत जगाला छेद देते. रानडेंच्या रेखाचित्रात आपल्याला कुत्रा, मांजर, ससा, मासा इत्यादि प्राणी व पक्षी काही वेळा धावणार्या, झेप घेणार्या, उलट्या-सुलट्या अवस्थेतल्या, एकमेकात गुंतलेल्या तर कधी कापून ठेवल्या सारख्या अवस्थेत दिसून येतात. या शिवाय मानवी शरीरांतर्गत अवयव, शरीराचे बाह्यभाग तसेच मानव आणि प्राणी यांच्या संयोगाने झालेल्या प्रतिमाही आढळतात. या बरोबरच चबुतर्यावरील पूर्णाकृती पुतळे व अर्धपुतळे, शिर नसलेले मानवी धड, उंचच उंच निमुळते होत गेलेले मनोरे, स्तंभ, घुमटाकार वास्तुरूपे, तलवार-बंदुकांसारखी जुनी-नवी शस्त्रे, घरातील कपाट, नळ, घड्याळ, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, शिल्प बनवण्याचे साचे आशा अनेक प्रतिमा त्यांच्या चित्रातून दिसतात. मठातील भिक्षू, सुटाबुटातील बुर्झ्वा समाजातील माणूस, शिरस्त्राण घातलेले घोडेस्वार योद्धे, इंद्रियोद्दीपक स्त्रीरूपे इत्यादींचा सहभागही या रेखाचित्रातून आहे. रानडेंच्या रेखाचित्रांची विविधता लक्षणीय आहे. अनेक वेगवेगळ्या संकल्पना त्यांच्या रेखाचित्रातून कार्यरत होताना दिसतात. विशेष करून मानव आणि प्राणी-पक्ष्यांचे काही रूपबंध नव्याने तयार झालेले त्यांच्या चित्रांतून दिसतात. मानवी मनात खोलवर रूतलेले पशुत्वाचे सुक्ष्म गुणधर्म व प्राण्यांचे मानवी व्यवहारातील वर्तनाशी जुळणारे हावभाव, आविर्भाव रानड्यांनी आपल्या रेखाटनातून सूचित केले आहेत. या बरोबरच मानवी मनातील लैंगिक वासना, क्रौर्य, लालसा या नैसर्गिकच पण शिष्ट समाजातील व्यवस्थेमुळे दबून राहिलेल्या या भावनांना रानडे यांनी सांकेतिकरीत्या टिपलेले दिसते. रानडेंची रेखाचित्रे पाहताना आपण त्यातील परिचित प्रतिमांमुळे चित्रात सहज प्रवेश करतो, मात्र त्यातील परस्परांशी संबंध नसलेल्या प्रतिमांच्या आयोजनामुळे आपण एका वेगळ्याच अतार्किक जगात भ्रमण करत आहोत असे वाटते. रानडेंच्या अनेक चित्रांतून अंतर्गत शरीर-अवयव आपल्याला दिसतात. विशेषतः जीभ बाहेर काढलेले स्त्री-पुरुष! अत्यंत संवेदनाक्षम असलेल्या या अवयव आकाराचा रूपकात्मक वापर त्यांनी केला आहे. एका चित्रात रानडेंनी या जिभा काढून मांडल्या व त्यांची वर-खाली होणारी हालचाल बद्ध केली आहे. या जिभा त्यांनी वस्तूप्रमाणे मांडल्या आहेत. आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग असलेली जीभ आपल्या शारीरिक अवकाशातून वेगळी काढून भौतिक अवकाशात ठेवली जाते तेव्हा आपल्याला मिश्र संवेदनांचा एक विचित्र अनुभव येतो तर, एका रंगचित्रात पाठमोरी मनुष्याकृती पाठीमागे लाल रंगाचे आतडे हातात धरून उभी आहे. समोर शिंगे असलेल्या गेंड्याची तोंडे तरंगताना दिसतात. गूढ आणि विचित्र स्वप्नासारखे हे चित्र आहे. एका रंगचित्रात भिंतीवर यूरोपियन, भारतीय, फूटबॉल प्लेअर, मोगल काळातील शिरस्त्राण घातलेला एक घोडेस्वार योद्धा अशा पाच भिन्न प्रकारच्या व्यक्तिविशेषांची ( characters ) एक कृती शृंखला दिसते. प्रत्येक जण दुसर्यावर आक्रमण करताना दिसतो. यातून दृश्य होणारे काहीसे उपरोधात्मक नाट्य रानडे यांच्या या चित्रातून अवतरते. मानवी मनातील मूळ आदिमानवी परस्परांवर कुरघोडी करण्याची प्रवृत्ती सूचित होते. वस्तुसंग्रहालयातील कामाच्या स्वरूपातून रानडे यांचा पशू-पक्षी जगताशी निकटचा संबंध आल्यामुळे मानवेतर जीवसृष्टी व त्यांचे भावविश्व याच्याशी त्यांचे नाते जुळले. तसेच पंचतंत्र किंवा तत्सम साहित्यातील ऐकलेल्या-वाचलेल्या गोष्टींमुळे त्यांच्या चित्रात पशू-पक्ष्यांच्या विविध प्रतिमा कधी रूपकाच्या अंगाने तर कधी प्रतिकात्मक अंगाने विपूल प्रमाणात येतात. या दृष्टीने भोपळा आणि म्हातारीच्या प्रसिद्ध गोष्टीवर आधारित असलेले रंगचित्र गमतीशीर (Playful) आहे. चित्रात एक म्हातारी हातात काठी घेऊन लांडगा, कोल्हा यांना ओलांडून तरातरा चालते आहे. मात्र हे गोष्टीचे इलस्ट्रेशन नसून त्यातील प्रतिमांची पुनर्मांडणी करणारा रूपबंध आहे. एका रेखाटनात रानडे यांनी भारतीय पुराणातील मूर्ती-प्रतिमा संकेतांचा ( Indian Iconography ) आधार घेऊन त्याला आधुनिक काळात आणले आहे. अनेक पाय व हात असलेले दोन पुरुष एका ‘ स्त्रीवर ‘ पाय देऊन ऊभे आहेत. त्यापैकी एका पुरुषाच्या हातात सफरचंदाची टोपली असून त्यातील सफरचंदाला ‘ अॅडम आणि ईव्ह ‘ पासून असलेली कालातीत प्रतिकात्मकता व लैंगिक भावनांशी असलेल्या संबंधित क्रियांचे अनेक पदर सूचित होतात. एका चित्रात एका ब्रेसीयर घातलेल्या व शिंग असलेल्या तरुणीच्या पाठीमागे लांब जीभ काढलेला व शिंग असलेला पशुस्वरूप एक माणूस आपल्याला दिसतो तर, एका चित्रात पक्ष्यावर पडलेला, स्वतःवरच बंदूक रोखलेला एक प्रौढ आणि जिभा जवळ आणलेले एक तरूण युगूल दिसते. या शिवाय मानवी अंगठे असलेले प्राणी, कासवाच्या मागच्या बाजूला फुटलेले दोन ‘ आ ‘ वासलेले मानवी चेहरे, उंचच उंच चबुतर्यावर उतरलेला एक घोडेस्वार योद्धा, एका डोंगराच्या पार्श्वभूमीवर विरुद्ध दिशांना धावणारे दोन ससे तर परस्पराभिमुख असलेली, जवळ आलेली दोन कासव अशा भिन्न-भिन्न एकमेकांशी तार्किक संबंध नसलेल्या प्रतिमांच्या रचना रानडेंच्या चित्रातून दिसतात. या प्रतिमांच्या कृतीशिलतेमुळे, हालचालीमधून एक संवाद घडताना दिसतो पण नेमका काय? हाच त्यातला पेच आहे. एकंदरच रानडेंच्या रेखाचित्रे आणि जलरंगातील रंगचित्रांचा नेमका आशय काय? असा विचार केला तर मानवाला भावणार्या अर्थपूर्ण जगातील एक संदिग्ध निरर्थकता असाच दिसतो. निश्चित स्वरूपात तार्किक विधान, अर्थ व्यक्त न करणारी, मात्र दृश्यरूपातून एक तरल संवेदनविश्व साकारणारी ही चित्रे आहेत. माधव इमारते. |
|||||||||||
|
|||||
© 2002 The Guild | All rights reserved |
Find us on |